इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत बेंजामिन नेत्यानाहू यांचे लोकेशन मिळत नसल्याने उलट सुलट चर्चा

Foto
तेलअवीव : पश्चिम आशियामध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाने आता निर्णायक वळण घेतले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. इराणच्या सोशल मीडियावरून बेंजामिन नेतान्याहू, त्यांचे बंधू इडो नेतान्याहू आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्वीर हे इस्रायली हवाई हल्ल्यात जखमी किंवा ठार झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, इस्रायली प्रशासनाने हे वृत्त 'फेक न्यूज' असल्याचे सांगत फेटाळले आहे.

'ऑपरेशन रोअरिंग लायन' आणि अमेरिकेची साथ
दरम्यान, 10 मार्च 2026 रोजी नेतान्याहू यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित केलं आहे. 9 मार्च रोजी त्यांनी राष्ट्रीय आरोग्य कमांड सेंटरला भेट दिली, ज्याचा व्हिडिओ त्यांच्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर हे युद्ध पेटले. इस्रायलने 'ऑपरेशन रोअरिंग लायन' तर अमेरिकेने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणवर संयुक्त हल्ले चढवले आहेत. अमेरिकेच्या दाव्यानुसार, इराणची क्षेपणास्त्र क्षमता 90 टक्के नष्ट करण्यात आली आहे. इराणमधील अणुकेंद्र, लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे.

इराणचा पलटवार, जागतिक तेल पुरवठ्यावर संकट
इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायल, आखाती देश आणि इराक मधील अमेरिकन तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. जगाच्या 20 टक्के तेल पुरवठ्याचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने सुरुंग पेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकन नौदलाने इराणच्या सुरुंग पेरणाऱ्या नौका उद्ध्वस्त केल्याचे बोलले जात आहे.  इराणमध्ये आतापर्यंत 1300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 10 हजारहून अधिक ठिकाणांचे नुकसान झाले आहे.

प्रादेशिक तणाव आणि हिजबुल्लाचा सहभाग
इराणच्या मदतीसाठी लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवला आहे, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने बैरुतवर बॉम्बहल्ला केला. दुसरीकडे, इराक मधील इराण समर्थक गटांनी अमेरिकन तळांवर डझनभर हल्ले केले आहेत, ज्यामध्ये 140 अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत.

युद्ध कधी थांबणार?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध "खूप लवकर" संपू शकते अशी आशा व्यक्त केली असली, तरी नेतान्याहू यांनी मात्र इराणमधील राजवट उलथवून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी हे जखमी असूनही सुरक्षित असल्याचे समजते.